आपला आयुष्य विमा पुरेसा आहे का?

(विम्याचे महत्त्व जाणून घेण्यासाठी वाचा विमा – साथी संकट काळचा)

सुनील  एक ३५ वर्षाचा विवाहित तरुण आहे.  त्याची बायको सुनिता (३१ वर्ष ) आणि २ छोटी मुले सुयश (७ वर्ष) आणि सनद (४ वर्ष) हे त्याचे कुटुंब. आपल्या मुलांना चांगले शिक्षण देणे आणि त्यांना आपल्या पायावर उभे करणे, तसेच स्वतःसाठी आणि बायकोसाठी निवृत्तीनंतरच्या सुखी जीवनाची पायाभरणी करणे हे   सुनील चे आर्थिक उद्दिष्ट आहे. त्यासाठी तो अहोरात्र परिश्रम करून पैसे जमा करतो आहे. आणि त्या पैशाचे योग्य ते गुंतवणूक नियोजनही करत आहे.

 या वर्षी सुनील आपल्या कुटुंबासाठी एक छोटेसे घर विकत घेतले.  यासाठी त्याने ४० लाखाचे कर्ज ही बँकेतून घेतलेले आहे. सुनील आर्थिक दृष्ट्या सजग असल्यामुळे त्याने आधीपासूनच आयुष्य  विमाच्या विविध पोलिसी विकत घेतल्या आहेत.

सुनील च्या  मते त्याने आपल्या कुटुंबासाठी लागणारी सर्व आर्थिक  सुरक्षिततेची जबाबदारी पार पाडली आहे.

सुनीलच्या  कुटुंबाचे उदाहरण घेऊन  आपण आयुष्य विम्याविषयी अधिक माहिती घेऊ.

आयुष्य विमा म्हणजे काय?

कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा काही कारणामुळे मृत्यू झाल्यास त्याचे पूर्ण कुटुंब आर्थिक दृष्ट्या हतबल होते.  अशा वेळेला आयुष्य विमा कुटुंबाच्या मदतीला धावून येतो. विमा कंपनी विमाधारकाच्या कुटुंबाला पॉलिसीनुसार रक्कम देते. त्याचा अर्थ मृत्यूमुळे आलेल्या आर्थिक अडचणींचा सामना हे कुटुंब पॉलिसीतून मिळालेल्या रकमेमुळे करू शकते.

 

किती आयुष्य विमा पुरेसा आहे?

आता आपण सुनीलच्या कुटुंबाचा विचार करू.  सुनील च्या म्हणण्यानुसार त्याच्याकडे २० लाख रकमेच्या २  विमा पॉलिसी आहेत. याचा अर्थ असा की दुर्दैवाने जर सुनीलचा मृत्यू ओढवला  तर त्याच्या कुटुंबीयांना ४० लाख रुपये विमा कंपनीकडून मिळतील. हे मिळालेले ४० लाख रुपये त्याच्या कुटुंबाची आर्थिक गरज भागवण्यासाठी पुरेसे आहेत का याचा आढावा प्रथम घ्यायला लागेल.

 

सुनील वर असलेल्या कर्जाची रक्कम रुपये ४० लाख
सुनीलच्या दोन्ही मुलांचा शिक्षणाचा खर्च – प्रत्येक मुलासाठी १५ लाख रुपये वयाच्या १८ व्या वर्षी तयार ठेवावेत अशी सुनील ची इच्छा आहे. (शैक्षणिक महागाई(education inflation) = ८ %,  गुंतवणुकीचा परतावा = ८%) रुपये ३० लाख
सुनिता चा जिवंत असेपर्यंत चा खर्च( घर खर्च तसेच जीवनशैलीशी निगडित  खर्च), मुलांचा कमवते होईपर्यंत असणारा खर्च. रुपये ७० लाख ( अंदाजे)
एकूण आवश्यक रक्कम ( A)  रुपये १ कोटी ४० लाख
सध्याच्या पॉलिसीतून मिळणारी रक्कम (B) रुपये ४० लाख
आत्तापर्यंत ची   विविध गुंतवणूक पर्यायांमध्ये  असलेली रक्कम (C) रुपये २० लाख
किती रकमेचा विमा अजून घ्यावा लागेल (A-(B+C)) रुपये ८० लाख

 

याचा अर्थ  सुनील ला जर आपल्या कुटुंबाच्या सर्व आर्थिक गरजा आपल्या पश्चातही पूर्ण करायच्या असतील तर त्याला अजून ८०  लाखाचा विमा उतरवणे आवश्यक आहे.

 

तुमचा विमा कुटुंबासाठी पुरेसा आहे का?

सुनील च्या उदाहरणावरून प्रत्येकाने आपला आयुष्य विमा आपल्या कुटुंबाच्या आर्थिक उद्दिष्टांसाठी आणि जीवनशैलीसाठी पुरेसा आहे का हे पडताळून पाहणे अत्यंत आवश्यक आहे.  त्यासाठी आपण काय करावे?

  1. प्रथम तुमच्या वरील आर्थिक जबाबदाऱ्यांचा आढावा घ्या.  आर्थिक जबाबदाऱ्या म्हणजे तुमच्यावर असलेले कर्ज, तुमच्यावरती अवलंबून असणाऱ्या कुटुंबातील लोकांचा खर्च,  मुलांची शिक्षणे, दैनंदिन आयुष्यातील खर्च इत्यादी. या एकंदर आर्थिक जबाबदाऱ्यांच्या खर्चाला आपण (A) म्हणू.
  2. पुढची पायरी म्हणजे आपल्याकडे असलेल्या सर्व आयुष्य विमा  पॉलिसींचा आढावा घ्या. त्यामध्ये प्रत्येक पॉलिसीमध्ये किती रक्कम विमा कंपनी आपल्या कुटुंबाला देईल,  हे पहा. त्या सर्वांची बेरीज करून तुम्हाला तुमचे आत्ताचे विमा संरक्षण किती आहे हे कळेल. आपल्याकडे असलेल्या विमा संरक्षणाचा रकमेला आपण (B)  म्हणू.
  3. आता तुमच्याकडे असलेल्या गुंतवणुकीचा आढावा घ्या.  जी गुंतवणूक तुमच्या मागे तुमच्या कुटुंबियांच्या उपयोगी  येऊ शकेल. तुमचा स्वतःचा राहतं घर ही गुंतवणूक असू शकत नाही.  कारण तुमच्या पश्चात देखिल तुमच्या कुटुंबाला तिथे राहण्यासाठी त्याची गरज आहे.   आपल्याकडे असलेल्या गुंतवणुकीच्या रकमेला आपण (C ) म्हणू.
  4. जर तुमचा नवरा किंवा बायको कमावते असतील तर त्यांच्या भविष्यातील कमाईचा अंदाजही घ्यावा लागेल.  या रकमेला आपण (D) म्हणू.
  5.  अचानक पणे  जर आजच मृत्यू आला,  तर तुमच्या आर्थिक जबाबदाऱ्यांचा खर्च आहे A.  त्यातून सध्याचा विमा संरक्षण (B), सध्याची गुंतवणूक (C ),  आणि भविष्यात नवरा किंवा बायको ने कमावलेला पैसा(D) हे वजा करा.
  6.  जर B+C+D  हे A पेक्षा अधिक असतील [(B+C+D) > A],  तर तुमच्याकडे पुरेसे विमा संरक्षण आहे. अन्यथा तुम्हाला [A- (B+C+D)] एवढ्या अधिकच्या विमा संरक्षणाची गरज आहे.

 

आयुष्य विम्याचे महत्त्व हे आपल्या आणि कुटुंबाच्या भविष्यासाठी अनन्यसाधारण आहे.  दुर्दैवाने, बऱ्याच वेळा आयुष्य विमा चा उपयोग हा प्राप्तिकर वाचवण्याचे एक साधन एवढ्या दृष्टीनेच केला जातो.  बहुतेक लोकांना आपण भरत असलेल्या विम्याचे हप्ते पाठ असतात परंतु जर किती रकमेचा विमा उतरवला आहे हा प्रश्न विचारला तर ते अनुत्तरीत राहतात.  अशा प्रकारच्या लोकांमध्ये आपणही येत असाल, तर आजच आपला विमा पुरेसा आहे का या प्रश्नाचे उत्तर शोधा. 

आपल्या कुटुंबाला आर्थिक दृष्ट्या सुरक्षित बनवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *