आमदनी अठन्नी , खर्चा रुपय्या

शाळेत असताना आपण सर्वांनी जमाखर्चाची गणिते सोडवली होती. एखाद्याकडे जमा असलेल्या पैशातून त्याचे विविध खर्च वजा जाता सरतेशेवटी त्याच्याकडे किती शिल्लक उरेल अशा अर्थाची ही आकडेमोड असायची.

आर्थिक नियोजन : सुरुवात कशी करावी? ह्या ब्लॉग मध्ये आपण आपली मिळकत आणि आपला खर्च याचे आर्थिक  नियोजनतले महत्त्व पाहिले आहे. आपला मासिक अधिशेष (Monthly Surplus) किती आहे यावर आपण आपली आर्थिक  उद्दिष्टे कशी पूर्ण करू शकू हे अवलंबून आहे.

आपल्या मिळकती विषयी आपण बरेच  जागरूक असतो. आपला पगार किंवा धंद्यातून होणारी मिळकत याव्यतिरिक्त अजून मिळकतीचे काय स्त्रोत आपल्याला मिळू शकतील त्याचा आपण नेहमी विचार करतो. परंतु महिन्याच्या सुरुवातीला मिळालेल्या ह्या पगारातून महिन्याच्या अखेरीपर्यंत  किती शिल्लक राहतील याविषयी आपण किती जागरूक असतो? बऱ्याच वेळेला महिनाअखेरीस होणारी पैशांची ओढाताण आपण सर्वांनीच कमी-जास्त प्रमाणात अनुभवलेली असेल.

आपल्या मिळकती प्रमाणे आपल्या खर्चाविषयीची जागरूकता आपण वाढवायला हवी.  खर्चाविषयी जागरुकता वाढविणे म्हणजे नक्की काय? सुरुवात कशी करायची?

केलेल्या खर्चाची नोंद

आज आपल्या सगळ्यांकडेच स्मार्टफोन्स  आहेत. दिवसभराचा खर्च लिहिण्यासाठी आपण स्मार्ट फोन वरती त्याची नोंद करू शकतो.  आपला जमाखर्च लिहिण्यासाठी मदत करणारी विविध ॲप्लिकेशन आज उपलब्ध आहेत. त्यातली बरीचशी मोफत डाऊनलोड करू शकता. दिवसभरामध्ये केलेला खर्च रात्री झोपायच्या आधी स्मार्टफोन मध्ये नोंद करण्याची सवय आपण अंगीकारू शकतो. आपल्याकडे जर स्मार्टफोन नसेल तर एखाद्या वहीमध्ये आपण याची नियमित नोंद करू शकतो.  नोंद करणे महत्त्वाचे.

नक्की खर्च कशावर केला?

एकदा तुम्हाला खर्च नोंद करायची सवय झाली की मग त्या खर्चातून  किती खर्च हे घरात लागणार्‍या वस्तूंवर केलेले आहेत आणि किती खर्च हे आपल्या जीवनशैलीशी निगडित आहेत याचा ऊहापोह करता येईल.  

जसे की

 • घर  खर्च
   • दैनंदिन जीवनात लागणारे किराणा मालाचे सामान
   • बाजारहाट
   • घर भाडे किंवा  सोसायटीला द्यावे लागणारे खर्च
   • नोकरांचा  पगार
   • गाडीचा इंधन खर्च
   • डॉक्टर आणि औषधांचा खर्च
   • विजेची बिले  इत्यादी
 • जीवनशैलीशी निगडीत खर्च
   • मॉलमध्ये केलेली खरेदी
   • व्यायाम शाळेची फी
   • मनोरंजनाचे खर्च जसे की सिनेमा पहाणे
   • वार्षिक पर्यटनाचा खर्च इत्यादी
 • आर्थिक दृष्ट्या आपल्यावर अवलंबून असणाऱ्यांचे खर्च
   • मुलांची शाळेची फी आणि इतर खर्च
   •  आई-वडिलांशी, भावंडांशी  संबंधित खर्च
 • कर्जाचे हप्ते
  • गृहकर्ज,  वाहन कर्ज यावरील हप्ते

खर्च किती करावा?

एकदा आपण खर्चाचे वर्गीकरण केले की आपला खर्च हा आवश्यक गोष्टींसाठी किती असतो आणि किती चैनीच्या गोष्टी साठी असतो याचा अंदाज आपल्याला येऊ लागतो.  सुपर मॉल आणि ऑनलाइन शॉपिंग यामुळे अनेक लोक विनाकारण खर्च करतात. या लोकांचे जीवनशैलीशी निगडित खर्च हे त्यांच्या इतर सर्व खर्चापेक्षा बरेच जास्त असतात.  यामुळे अनेकदा त्यांच्यावर क्रेडिट कार्डचे कर्ज होऊ शकते. जे सर्वात महाग कर्जापैकी एक आहे.

आपल्या मिळकतीच्या साधारण तीस ते पस्तीस टक्के  आपल्या कर्जांचे हप्ते असावेत. साधारण पंचवीस  ते तीस टक्के हा आपला एकंदर खर्च ( घर खर्च,  जीवनशैलीशी निगडीत खर्च आणि आर्थिक दृष्ट्या आपल्यावर अवलंबून असणाऱ्यांचे खर्च) असावा. हे ठोकताळे काटेकोरपणे पाळल्यास आपल्याकडे पंचवीस ते तीस टक्के पर्यंत गुंतवणुकीसाठी पैसे उपलब्ध राहू शकतात.

खर्चिक सवयींचे आत्मपरीक्षण

आपण नाहक खर्च का करतो? अनेक वेळेला मित्रांचा किंवा समाजाचा दबाव हे एक प्रमुख कारण असू शकते.  काही जण तर विरंगुळा म्हणून देखील खरेदी करतात. आपली आर्थिक संपन्नता दाखवून देण्यासाठी अनेक अनावश्यक गोष्टींची खरेदी केली जाते.  काही जणांमध्ये Impulsive Shopping म्हणजे एखादी वस्तू पाहिली की घ्यावीशी वाटणे ची समस्या असते. त्यांच्या या सवयीचा सुपर मॉल्समध्ये पुरेपूर फायदा उठवला जातो.  आणि मग हे लोक अनेक नको असलेल्या गोष्टींची खरेदी करतात. ऑनलाइन शॉपिंग हे देखील खर्च वाढवण्याच्या दृष्टीने कारणीभूत ठरले आहे. बहुतेक वेळेला इथे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड मार्फत अथवा बँकेच्या अकाउंट मधून परस्पर पैसे दिले जातात.  अशाप्रकारे केलेला खर्च हा बरेच वेळा आपल्याला जाणवत नाही. आणि आपण मोठी खरेदी करून बसतो.

आपल्या खर्चिक सवयींचे आत्मपरीक्षण  हा आर्थिक नियोजनाच्या प्रवासात महत्त्वाचा टप्पा आहे.  जेवढे आपण आपल्या खर्चाच्या बाबतीत जागरूक राहू तेवढेच आपण जास्त पैसे वाचवू शकू. जे आपल्या आर्थिक उद्दिष्टांच्या दृष्टीने फायद्याचे ठरेल.

चला तर मग,  आजपासूनच आपण पैसा कुठून येतो याबरोबरच तो कुठे खर्च होतो याविषयी जागरूक राहू.  आपली मिळकत आणि आपला खर्च यांचा योग्य तो समतोल राखून जास्तीत जास्त शिल्लक कशी राहील याकडे लक्ष देऊ. ही शिस्त पाळल्यास आपण आपल्या आर्थिक उद्दिष्टांकडे यशस्वी वाटचाल करू शकतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *