महत्व आर्थिक नियोजनाचे

आपले जीवनात पैशाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.  अगदी ‘ तू है तो सब कुछ है, ना कोई कमी है’ अशीच परिस्थिती म्हणा ना! सुख सुख म्हणजे काय असतं, तर पैशाने वॉलेट भरलेलं असतं  यावर पूर्ण विश्वास असणारे आपण. एकदा का माझ्याकडे पैसा आला की जगातली सगळ्यात आनंदी व्यक्ती म्हणजे मीच, यात कोणाचेच दुमत नाही.

शिक्षण झालं, पदवीधर झालो की मग आपल्याला मिळते ती नोकरी.  किंवा आपण सुरू करतो एखादा उद्योग. आणि तिथून आपली आणि पैशाची  पकडापकडी सुरू होते. काय केलं म्हणजे भरपूर पैसे कमावता येतील आणि जगातील सर्व सुखे मला आणि माझ्या कुटुंबीयांना कशी देता येतील याचे विचार मनात सुरू होतात.

या विचारातूनच आपापल्या नोकरी व्यवसायात प्रगती कशी करावी याचे विचार आपल्या मनात चालू असतात. आणि त्याबरोबरच कमावलेल्या  पैशाची कशा प्रकारे गुंतवणूक करावी, जेणेकरून जास्तीत जास्त परतावा मिळेल हेही आपण शोधत असतो.

आपल्याला आयुष्यात आपल्या जवळच्या लोकांसाठी आणि स्वतः साठी ठरवलेली अनेक स्वप्ने जर पूर्ण करायची  असतील, तर पैशाविषयी एक वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आर्थिक नियोजन आणि संपत्ती नियोजन सुरुवातीपासूनच करणे फार आवश्यक आहे. माय मनी ध्यानी मनी या ब्लॉगमधून आपण आर्थिक नियोजन,  गुंतवणूक पर्याय, रिटायरमेंट साठी ची तयारी आणि प्राप्तिकर म्हणजेच इन्कम टॅक्स, अशा अनेक विषयांवर चर्चा करणार आहोत.

आर्थिक नियोजन म्हणजे नक्की काय असते हे आधी आपण समजावून घेऊ.

पैशांची बचत करणे हा आपल्या भारतीयांचा स्थायीभाव आहे.  आपल्याला लहानपणापासूनच पैसा जपून वापरावा, त्याचा अपमान करू नये आणि त्याचा  अपव्यय टाळावा, याचे बाळकडू मिळालेले आहे. बचतीचे महत्त्व असणाऱ्या देशांमध्ये आपण फार अव्वल आहोत.  तर मग आर्थिक नियोजनाचे महत्त्व आता इतके आधी का महत्त्वाचे नव्हते?

आजूबाजूची जागतिक अस्थिरता,  जागतिक घडामोडींचा आपल्या दैनंदिन जीवनावर  होणारा परिणाम, धकाधकीचे जीवन मान, आणि विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आपले आयुष्य  म्हणजे तारेवरची कसरत झाले आहे. अशावेळी येणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्यासाठी, वेळोवेळी वाढत्या खर्चासाठी  पैशांची तरतूद करणे अनिवार्य ठरते. आणि यातूनच आर्थिक नियोजनाची गरज भासू लागते.

 

आर्थिक नियोजनाचे पाच टप्पे  आहेत.

 

पहिला :  आपत्कालीन निधी (Contingency Fund)

 आपल्यात एक म्हण आहे ‘ संकटे सांगून येत नाहीत’.  आपत्कालीन निधी अशा अचानकपणे उद्भवलेल्या कठीण प्रसंगांमध्ये आपल्याला मदत करतो. अचानकपणे नोकरीतून  कमी करणे, एखादे आजारपण अशा संकटांमध्ये आपत्कालीन निधी चा उपयोग करता येतो. हा निधी जर नसेल, तर अडीअडचणींसाठी म्हणून आपण आपल्या इतर गुंतवणुकीतून पैसे उभे करण्याचा प्रयत्न करतो आणि आपले आर्थिक नियोजन कोसळते.   पुढे येणाऱ्या ब्लॉगमध्ये आपत्कालीन निधी किती असावा आणि तो कुठे गुंतवावा याविषयीची सविस्तर माहिती आपण घेऊ.

 

दुसरा : विमा व्यवस्थापन (Insurance Planning)

आयुष्य विमा आणि आरोग्य विमा याचे योग्य नियोजन करणे हे आर्थिक स्वास्थ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.  विमा घेणे म्हणजे प्राप्तिकर वाचवण्याचा चांगला मार्ग ह्यापुढे जाऊन त्याचा विचार आपण करतो का?

घरातील कमावत्या व्यक्तींच्या निधनामुळे होणारे आर्थिक नुकसान भरून काढणे हा आयुष्य विमा घेण्याचा मुख्य उद्देश आहे.  आपण सर्व आयुष्यविमा घेतोच. पण तो घेतलेला विमा गरज पडेल तेव्हा संपूर्ण कुटुंबाच्या आर्थिक गरजा जसे दैनंदिन व्यवहारात लागणारे खर्च,  मुलाबाळांची शिक्षण त्यांची लग्न इत्यादी पूर्ण करू शकेल का याचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे.

 

तसेच एखादी आरोग्यविषयक समस्या उभी  राहिली आणि हॉस्पिटलमध्ये राहण्याची गरज पडली, तर तो खर्च भागवण्यासाठी आपल्याला आरोग्य विम्याची मदत होते.  आपण घेतलेला आरोग्य विमा त्यादृष्टीने पर्याप्त आहे का त्याचा विचार करायला हवा.

 

तिसरा :  उद्देशपूर्तीसाठी केलेली गुंतवणूक (Goal Based Planning)

आपण जेव्हा पैसे कमावतो तेव्हा ते आपल्या कुटुंबियांच्या कामी यावेत आणि त्यांच्या इच्छा-आकांक्षा आपण पूर्ण करू शकू हा आपला मुख्य  उद्देश असतो. आर्थिक नियोजनामध्ये हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे जिथे संपूर्ण कुटुंबाची स्वप्ने आणि त्याचे आर्थिक उद्दिष्ट याचा अभ्यास केला जातो.  आपली सध्याची आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन पुढे आपल्याला कशा पद्धतीची गुंतवणूक आपल्या आर्थिक उद्दिष्टापर्यंत घेऊन जाईल याचा सारासार विचार या टप्प्यावर आपण करतो.  आपली पैशाविषयी धोका पत्करण्याची तयारी किती आहे यावरून कुठच्या पद्धतीचा गुंतवणूक पर्याय निवडावा तसेच आपली आर्थिक उद्दिष्टे आपल्यापासून किती लांब अथवा जवळ आहेत ह्यावर गुंतवणूक नियोजन केले जाते.

 

चौथा : सेवानिवृत्ती नियोजन (Retirement Planning)

मुलाबाळांच्या  गरजा भागवता भागवता आपल्या म्हातारपणाची आर्थिक व्यवस्था तर आपण विसरत नाही ना?  रिटायरमेंट प्लॅनिंग म्हणजे सेवानिवृत्ती नियोजन हे आपल्या सुखी आणि समाधानी सेकंड इनिंग साठी महत्त्वाचे आहे.   ह्या वयामध्ये आपण शारीरिक आणि आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर राहावे असे प्रत्येकाला वाटते. सुरुवातीपासूनच या अतिशय महत्त्वाच्या टप्प्यासाठी गुंतवणूक करणे महत्त्वाचे ठरते.   प्रॉव्हिडंट फंड, पेन्शन आणि PPF सारख्या काही महत्त्वाच्या गुंतवणुकीचा इथे विचार होतो.

 

पाचवा: इच्छापत्र (Estate Planning)

आयुष्याच्या शेवटी आपण कमावलेली मालमत्ता पुढच्या पिढीकडे कायदेशीर दृष्ट्या सोपवणे म्हणजे इच्छापत्र.  कायद्याच्या दृष्टीने इच्छापत्र असणे ही गरज आहे. इच्छापत्र न करता एखाद्या व्यक्तीचे निधन झाले तर त्याच्या कुटुंबावर कोर्टात जाऊन कायदेशीर बाबी पूर्ण करून  घ्यायची जबाबदारी येते. इंडियन सक्सेशन लॉ नुसार दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबीयांना त्याची मालमत्ता वाटली जाते. आपल्या कुटुंबाला या जबाबदारीतून किंवा त्रासातून जर मुक्त ठेवायचे असेल आणि स्वतःच्या मनाप्रमाणे आपल्या संपत्तीचे वाटप करायचे असेल तर हा आर्थिक नियोजनात ला शेवटचा टप्पा महत्त्वाचा ठरतो.

 

चला तर मग,  आज पासून आपला प्रवास सुरू….. आर्थिक नियोजनातून आर्थिक स्वातंत्र्याकडे ……...

 

2 thoughts on “महत्व आर्थिक नियोजनाचे”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *