विमा – साथी संकट काळचा

खरा मित्र कोण तर जो संकटकाळी आपली मदत करतो.  या अर्थाची इंग्रजी म्हण आपल्या सर्वांच्या परिचयाची आहे.  जेव्हा आपल्यावर ती संकटे येतात, तेव्हा आपले हितसंबंधी आपल्या मागे ठामपणे उभे राहतात. आपल्या कुटुंबाची काळजी घेतात.  परंतु नेहमीच हे शक्य नसते.

आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपले आरोग्य  आणि आयुष्य यावर कधी काय संकट येईल हे सांगणे फार कठीण.  अशी संकटे आपल्याला भावनिक दृष्ट्या हतबल करतात. त्यातच आर्थिक दृष्ट्या देखील ती  जड जाऊ शकतात. आता ही उदाहरणेच पहा ना.

  1. सोनाने स्वबळावर  तिचा व्यवसाय एका अव्वल स्थानापर्यंत  उंचावला. कंपनीच्या वार्षिक हेल्थ चेक अप मध्ये दुर्दैवाने एका दुर्धर रोगाचे निदान झाले.
  2. रामभाऊ आणि बायको सुखाने निवृत्तीचा काळ व्यतीत करत होते.  एक दिवस रामभाऊ रक्तदाब वाढल्याने चक्कर येऊन पडले. अति रक्तदाबामुळे  मूत्रपिंडे निकामी झाल्याचे निदान झाले. आता डायलिसिस शिवाय पर्याय नाही, असे डॉक्टर म्हणतात.
  3. राहुल  वय वर्ष चाळीस, एक फिटनेस च्या बाबतीत अत्यंत काटेकोर असणारा मनुष्य.  रोजच्या रोज जिम मध्ये जाणे आणि सकस अन्न खाणे याविषयी अतिशय शिस्तबद्ध.   एक दिवस ट्रेडमिल वरती व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले.

 

या आणि अशा अनेक गोष्टी आपण ऐकतो.  पण दर वेळेला वाईट गोष्ट ही दुसऱ्याच्या बाबतीतच  घडते, अशी आपण आपल्या मनाची समजूत काढतो. अशा पद्धतीने आपण एक प्रकारे येणाऱ्या संकटाला आपल्याला  कोंडीत पकडण्याची संधीच देत असतो.

जर अशी संकटे आली,  तर आर्थिक दृष्ट्या आपल्याला आणि आपल्या कुटुंबांना  आर्थिक निर्भरता देण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य विमा करतो.

विम्याचा उगम

विम्याची सुरुवात युरोप मध्ये इटली येथे चौदाव्या शतकात झाली.  त्याकाळी व्यापारी लोक समुद्रमार्गे जहाजा वाटे आपला माल दूर देशांमध्ये  विक्रीसाठी पाठवत. अनेक वेळा वादळ, चोरी आणि माल खराब होण्याच्या कारणांमुळे त्यांचे मोठे नुकसान होत असे.  या नुकसानावर मात करण्यासाठी अशा काही व्यापारी लोकांनी एकत्र येऊन असे ठरवले की प्रत्येकाने थोडे थोडे पैसे एका पुंजी मध्ये गोळा करावेत जेणेकरून ज्या व्यापाऱ्यांना  प्रवासात नुकसान भोगावे लागेल, अशांना ही रक्कम देता येईल. अशा प्रकारे Marine इन्शुरन्सचा जन्म झाला.

विम्याचे प्रकार

विम्याचे  मुख्यत्वेकरून दोन प्रकार आहेत :

  • आयुष्य विमा आणि
  • जनरल विमा. (जनरल विम्यामध्ये आरोग्य विमा, चोरीचा विमा,  घराचा विमा असे अनेक प्रकार असतात.)

आयुष्य विमा

घरातल्या मिळवत्या व्यक्तीचे निधन झाले,  तर त्याचे अख्खे कुटुंब आर्थिक दृष्ट्या दुर्बल होते.  अशा परिस्थितीमध्ये कुटुंबाची आर्थिक गरज भागवण्यासाठी विमा कंपनी विमाधारकाच्या कुटुंबाला त्याच्या विमा पॉलिसी नुसार पैसे देते. आपल्या कुटुंबाला आर्थिक दृष्टीने सक्षम बनवण्यासाठी आणि आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाच्या ध्येयपूर्तीसाठी जसे की मुलांचे शिक्षण , त्यांची लग्ने  इत्यादी पुरेसा आयुष्य विमा असणे अत्यंत आवश्यक आहे. बरेच वेळा आयुष्य विमा हा प्राप्तिकर वाचवण्याचे साधन म्हणून खरेदी केला जातो. अशा वेळेला आपलं आयुष्य विमा आपल्या जीवनशैलीप्रमाणे पुरेसा आहे का हे तपासून पाहणे महत्त्वाचे.

 

आरोग्य विमा

आर्थिक नियोजनात प्रमुख अडथळे हे अचानक उद्भवलेल्या आजारांमुळे येऊ शकतात.  अशा वेळेला आपल्याला उपयोगी पडतो तो आरोग्य विमा. काही आजारामुळे जर आपल्याला रुग्णालयात  राहायची वेळ आली, तर तो खर्च या पद्धतीच्या विम्यातून मिळवता येतो. जेव्हा हॉस्पिटल मध्ये 24 तासांपेक्षा जास्त काळ राहावे लागते तेव्हा या  विमा मधून हा खर्च भागवला जाऊ शकतो. बरेच आरोग्य विमा डे केयर म्हणजे जिथे एका दिवसांपेक्षा कमी काळ हॉस्पिटलमध्ये राहावे लागते असे खर्चदेखील भागवतात. काही  कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना हा आरोग्य विमा उपलब्ध करून देतात. तरीदेखील स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा आरोग्य विमा उतरवणे हे नेहमीच फायद्याचे.

बदलत्या जीवनशैलीप्रमाणे  आजारांचे स्वरूप आणि तीव्रता वाढलेली आहे.  त्यानुसार विविध प्रकारचे आरोग्य विमा आज बाजारात उपलब्ध आहेत जसे की क्रिटिकल इलनेस कवर,  कॅन्सर पोलिसिज इत्यादी. आपल्या कुटुंबाचा आरोग्यविषयक आढावा घेऊन योग्य तो आरोग्य विमा नक्की विकत घ्यावा.

 

अशा या बहूपयोगी विम्याविषयी जास्त माहिती घेणे आपल्या प्रत्येकासाठी आवश्यक आहे.

 

पुढील ब्लॉग मध्ये आपण आरोग्य विम्याविषयी विस्ताराने बोलू.

 

1 thought on “विमा – साथी संकट काळचा”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *