आर्थिक नियोजन : सुरुवात कशी करावी?

आर्थिक नियोजनाचे महत्त्व आणि त्यातील वेगवेगळे टप्पे ह्याची तोंड ओळख आपण गेल्या  ब्लॉग मध्ये करून घेतलेली आहे. 

(अधिक माहितीसाठी वाचा : महत्व आर्थिक नियोजनाचे)

आता आपण एक पायरी पुढे जाऊ आणि आर्थिक नियोजनाची सुरुवात कशी करावी यावर थोडी चर्चा करू.

आपण जेव्हा एखाद्या प्रवासाला निघतो तेव्हा आपण आता कुठे आहोत आणि आपल्याला कुठे जायचे आहे हे पहिल्यांदा निश्चित करतो.  आर्थिक स्वायत्ततेच्या प्रवासाला निघताना देखील चार मूलभूत गोष्टींकडे आपल्याला पहिल्यांदा लक्ष द्यायचे आहे. त्या म्हणजे

 1. आपली मालमत्ता
 2. आपल्यावरील कर्ज
 3. आपली मिळकत
 4. आपला खर्च

संपूर्ण आर्थिक नियोजनाचा डोलारा ह्या चार मूलभूत गोष्टींवर आधारित आहे.  आता आपण ह्या विषयी अधिक माहिती घेऊ.

 

 1. आपली मालमत्ता

वेळोवेळी साठवलेल्या पैशांमधून आपण विविध गुंतवणूका करत असतो.  जसे की बँकेतल्या ठेवी, पोस्टातील गुंतवणूक जसे पब्लिक प्रोविडेंट फंड,  नॅशनल सेविंग सर्टिफिकेट इत्यादी. तसेच काही गुंतवणूक आपण शेअर मार्केट मध्ये आणि म्युचल फंड मध्ये देखील करतो.  अनेक जण सोने खरेदी देखील करतात. तर काहींची पसंती स्थावर मालमत्ता म्हणजे घर खरेदी कडे असते. आर्थिक नियोजनाची सुरुवात करताना पहिल्यांदा आपण काय काय मालमत्ता आजपर्यंत गोळा केली आहे त्याचा आढावा घ्या . तुमची एकंदर सांपत्तिक स्थिती कशी आहे हे दर्शवण्यासाठी आपल्या मालमत्तेचा आपण उपयोग करणार आहोत.

 

 1.  आपल्यावरील कर्ज

आपल्या आर्थिक   उत्कर्षा मध्ये अडथळा ठरू शकेल अशी गोष्ट म्हणजे कर्ज.  साधारणपणे कर्जा पासून लांबच राहावे अशी आपल्या सर्वांची मानसिकता असते.  परंतु काही वेळा नाईलाजाने किंवा काही विशिष्ट गोष्टी खरेदी करण्याच्या लालसेने आपण कर्ज घेतो.  आपल्याला माहित असलेल्या कर्जापैकी घरासाठी कर्ज, वाहनासाठी कर्ज, काही वैयक्तिक कारणासाठी कर्ज आणि क्रेडिट कार्ड वरती कर्ज या सर्वांची आपली ओळख असेलच.

यातील घरावरचे कर्ज हे सगळ्यात स्वस्त तर क्रेडिट कार्ड वरचे कर्ज हे सगळ्यात महाग याची जाणीव ठेवणे फार आवश्यक आहे.  बऱ्याच वेळेला आपण क्रेडिट कार्ड वापरतो आणि ज्यावेळी आपल्याला क्रेडिट कार्डचे बिल द्यायची वेळ येते तेव्हा काही कारणामुळे पैशांची चणचण असेल तर किमान रक्कम (minimum amount to be paid)  भरून आपण मोकळे होतो. पण याचाच अर्थ आपण भरलेली रक्कम आणि क्रेडिट कार्डच्या बिलाची रक्कम यातली तफावत म्हणजे आपण घेतलेले क्रेडिट कार्ड वरील कर्ज असते. त्यावर लागणारे व्याज हे प्रतिदिन आकारले जाते आणि म्हणूनच ते फार महाग असते.  क्रेडिट कार्डचा वापर हा विचारपूर्वक करावा आणि त्याचे बिल हे दिलेल्या वेळेनुसार पूर्ण भरावे.

कर्ज घेताना दोन प्रश्न तुम्ही विचारावे.  पहिला मला खरंच या कर्जाची गरज आहे का? आणि दुसरा  या कर्जाची परतफेड करण्याची क्षमता माझ्यात आहे का?

 

 1.  आपली मिळकत

वेगवेगळ्या माध्यमातून आपण पैसे कमावत असतो. जे नोकरी करतात त्यांना पगार मिळतो, जे उद्योग धंदा करतात त्यांना उद्योगातून उत्पन्न मिळते,    जे शेतकरी आहेत त्यांना शेतीतून उत्पन्न मिळते. काही उत्पन्न आपल्याला आपल्या मालमत्तेतून ही मिळते.  अशा बऱ्याच स्त्रोतातून आपण पैसे कमवतो.

 

 1.  आपला खर्च

आपल्या दैनंदिन जीवनात अनेक गोष्टींची गरज लागते.  या सर्वांसाठी आपल्याला येणाऱ्या मिळकतीतून खर्च करावा लागतो.  काही खर्च हे न टाळण्यासारखे असतात जसे की घरगुती नित्याच्या वस्तू.  ज्यात किराणा मालाचे सामान, मोबाईल इंटरनेटवरचा खर्च, औषध इत्यादींचा समावेश होतो.

या व्यतिरिक्त  थोडा खर्च मौजमजेसाठी चा  देखील असतो. जर आपण एखादे कर्ज घेतले असेल तर त्या कर्जाचे मासिक हप्ते देखील हे न  टाळण्या सारख्या खर्चामध्ये येतात. आर्थिक नियोजनाची तयारी करताना आपला खर्च ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.  आपला खर्च हा आपल्या आर्थिक नियोजनाचा पाया आहे.

या चार मूलभूत गोष्टींचा वापर आपण आर्थिक नियोजनात कसा करणार, ते पाहू.

 • एकंदर सांपत्तिक स्थिती (Networth)

आपली एकंदर सांपत्तिक स्थिती किती मजबूत आहे हे कळण्यासाठी आपली मालमत्ता आणि आपल्यावरील कर्ज यातील फरक काढला जातो.

  • एकंदर सांपत्तिक स्थिती =  आपली मालमत्ता – आपल्यावरील कर्ज

उदाहरणार्थ,  एखाद्याकडे पंचवीस लाखांची मालमत्ता असेल आणि त्याने दहा लाखाचे कर्ज घेतले असेल तर त्याची एकंदर सांपत्तिक स्थिती ही पंधरा लाख असेल.

जर आपली मालमत्ता ही आपल्यावरील कर्जापेक्षा कमी असेल तर आपली एकंदर सांपत्तिक स्थिती ही कमकुवत मानली जाईल.

 

 • मासिक अधिशेष (Monthly Surplus)

आपल्या अनेक आर्थिक उद्दिष्ट पर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला अधिक गुंतवणूक करणे आवश्यक ठरते. अशावेळी  आपली मासिक मिळकत आणि आपला खर्च याचा विचार करणे अनिवार्य ठरते.

 • मासिक अधिशेष =  आपली मिळकत – आपला खर्च

उदाहरणार्थ,  एखाद्याची मासिक मिळकत जर महिना पन्नास हजार असेल आणि त्याचा मासिक खर्च 35 हजार रुपये असेल तर त्याचा मासीक अधिशेष (monthly surplus)  महिना पंधरा हजार एवढा असेल. अर्थातच जेवढा अधिशेष जास्त तेवढा गुंतवणुकीस वाव जास्त.

खर्चाच्या बाबतीत काही ठोकताळे आहेत का? तर आपल्या एकंदर मासिक मिळकतीच्या जास्तीत जास्त 35 % आपला मासिक खर्च असावा,  आपल्यावर जर कर्ज असेल तर त्याचे मासिक हप्ते  मासिक मिळकतीच्या 35 ते 40 टक्‍क्‍यांहून अधिक नसावेत. याचाच अर्थ जर आपण दर महिना निदान 25% मिळकत गुंतवणुकीसाठी बाजूला काढून ठेवू शकलो तर आपले आर्थिक नियोजन सुकर होईल.

 

आर्थिक नियोजनाच्या या पहिल्या पायरीवर आपण चार मूलभूत गोष्टी आणि  त्यांचा आपली सांपत्तिक स्थिती कशी आहे , हे कळण्यासाठी चा उपयोग हे आपण पाहिले.

वर नमूद केल्याप्रमाणे आपला खर्च ही आपली जीवनशैली सुचवतो. आर्थिक नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची अशी ही गोष्ट आहे.  पुढच्या ब्लॉग मध्ये आपण पैशाच्या बाबतीत मानसिकता  आणि खर्च करण्याची सवय या विषयी  विस्ताराने बोलू.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *